Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 100 देशांचे राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. भेटीचा हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 27) आणि शनिवारी (दि. 28) या दोन टप्प्यात होणार आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही. हा कार्यक्रम आज (मंगळवारी, दि. 24) निश्चित होण्याची शक्यता आहे. 100 देशातील राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडी येथील जिनोव्हा बायो- फार्मासिटिक्युअल्स या दोन संस्थांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना माहिती दिली असून या दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा करून संपूर्ण कार्यक्रम निश्चित केला आहे.

अ‍ॅस्ट्राझेनका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये घेतले जात आहे. ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेल्या या लशीच्या ब्रिटनसह ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यातील काही निष्कर्षांमुळे कोरोनावर मात करण्यासाठी ‘कोव्हिशिल्ड’ ही लस उपयुक्त ठरणार असल्याचा या संस्थांनी दावा केला आहे.

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ही 90 टक्के परिणामकारक असल्याचा दावा अ‍ॅस्ट्राझेनका कंपनीने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर 100 देशातील राजदूत सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीचा आढावा घेणार आहेत.

दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून या राजदूतांसाठी चार लक्झरी बसची सोय करण्यात आली आहे. दोन गटांत त्यांची विभागणी करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने पुण्यातील सीरम आणि हिंजवडी मधील जिनोव्हा बायो- फार्मासिटिक्युअल्स या संस्थांची भेट घडवून आणली जाणार आहे.

शुक्रवारी सर्व देशांचे राजदूत पुण्यात येणार असून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची चर्चा आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्याचे अद्याप नियोजन झालेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.