Pune News : आंबेगाव कचरा प्रकल्प जळित प्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करणार : महापालिका आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज : आंबेगाव येथील सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प जळित प्रकरणी काही आजी-माजी नगरसेवकांची नावे पुढे येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ओळख परेड सुरू आहे. कायदा सर्वांना समान आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला.

कचरा प्रकल्प हटविण्यासाठी आंबेगाव येथे स्थानिक नागरिकांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर संतप्त नागरिकांना चिथावणी देत प्रकल्पात तोडफोड व जाळपोळ केली.

या संदर्भात आयुक्त कुमार म्हणाले, आंबेगाव कचरा प्रकल्पातील सीसीटिव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिस तपासामध्ये महापालिका प्रशासन मदत करत आहेत. सध्या प्रकल्पांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

प्रकल्पावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकरवी संशयीत व्यक्तींची ओळख परेड सुरू आहे. यामध्ये नगरसेवक असो पदाधिकारी असो की नागरीक असो सर्वांना कायदा समान आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.