Pune News : 72 कोटींचा मिळकतकर थकबाकी ठेवणाऱ्या ‘ॲमेनोरा’वर मेहेरबानी का ? – अरविंद शिंदे

आयुक्तांनी परस्पर थकबाकीवर 66 टक्के सवलत कशी काय दिली

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या 11 ग्रामपंचायतींपैकी साडेसतरा नळी येथील ॲमेनोरा पार्क टाऊनची मिळकतकरापोटी तब्बल 72 कोटी 5 लाख 83 हजार 643 रुपये थकबाकी आहे. थकबाकी वसूल करण्याऐवजी त्यांना थकबाकीच्या रकमेत 66 टक्के सवलत देण्याचा अजब निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. आर्थिक सवलतीचा निर्णय स्थायी समिती आणि मुख्य सभेत न आणता परस्पर कसा काय घेतला. महापालिका आर्थिक टंचाईतून जात असताना त्यांच्यावर इतकी मेहेरबानी का, असा सवाल काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आज, बुधवारी उपस्थित केला.

पुणे महापालिका भवनाच्या पत्रकार कक्षात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, “साडेसतरा नळी ग्रामपंचायतीच्या कालवधीमध्ये ॲमेनोरा पार्क टाऊन सिटी प्रकल्प उभा राहीला. त्यानंतर विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार नव्याने 11 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेच्या हद्दीत समावेश झाला.

त्यानंतर महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, गावे समविष्ठ होण्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेकडे ॲमेनोरा सिटीची मिळकतकर थकबाकी होती. आता महापालिकेच्या दरानुसार मिळकतकर आकारला गेला आहे. त्यानुसार ॲमेनोरा पार्क टाऊनची मिळकतकरापोटी तब्बल 72 कोटी 5 लाख 83 हजार 643 रुपये थकबाकी आहे.

परंतु, मिळकतकर अभय योजने अंतर्गत या रकमेमध्ये 66 टक्के सवलतीचा एकतर्फी निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कसा काय घेतला. स्थायी समिती आणि मुख्य सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव न आणता परस्पर कसा काय निर्णय घेतला, असा सवालही शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

महापालिकेच्या सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणे अपेक्षित होते. दरम्यान, थकबाकी वसुलीसंदर्भात महापालिकेच्या बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि विधी विभागाकडून अभिप्राय दिले गेले आहेत. तसेच सध्या महापालिकेची आर्थिक टंचाई वाढली आहे.

त्यामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी 66 टक्के सवलतीचा हा निर्णय आयुक्त कुमार यांनी तातडीने रद्द करावा. महापालिकेच्या मुख्य सभेत हा प्रस्ताव आयुक्तांनी आणावा,” अशी लेखी मागणी केली असल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.