Pune News : पुणे मेट्रोच्या भूमिगत कामाचा एक महत्वपूर्ण टप्पा टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ स्थानकापर्यंत पोहचले

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेमधील शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा मार्ग भुयारी असणार आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी 3 टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत 7 किमीचा (12 किमी पैकी) भुयारी मार्ग बनविला आहे. 2 टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला होता, तर 1 टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.

आज (दि. 22) कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्ग बनविणारे टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे पोहचत आहे.  आजमितीस सिव्हिल कोर्ट स्थानक पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ येथे “मुठा” टनेल बोरिंग मशीन पोहचत आहे. पुणे मेट्रोच्या कामाचा हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. दुसरे टनेल बोरिंग मशीन ‘मुळा लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे.

पुणे हे भारतातील चौथे शहर आहे जेथे भूमिगत मेट्रो मार्ग नदीच्या खालून जात आहे. याआधी मुंबई (मिठी नदी), कलकत्ता (हुगळी नदी), आणि चेन्नई (कुम आणि अचार या महानगरांमध्ये टनेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा बनविण्यात आला आहे.  मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे 33 मीटर खोल असून, नदी पात्राच्या तळापासून साधारणतः 10 मीटर खालून जात आहे. आज पुणे मेट्रोचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रो ट्रेन चालवण्याची चाचणी 1 वर्षापूर्वी घेण्यात आली होती. याच मार्गाचे 4 जुलै 2021 रोजी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांनी निरीक्षण केले. त्यामुळे तेथे मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीच्या दिशेने सुरुवात झाली आहे.

कोणत्याही मेट्रो मार्गिकवर प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांची परवानगी अनिवार्य असते. मेट्रोची दुसरी मार्गिका जी कोथरूड (वनाझ) येथून देखील मेट्रोची चाचणी 7 जुलै रोजी घेण्यात आली. जसे जसे काम पूर्णत्वाकडे जाईल तशी वनाझ ते गरवारे पर्यंत मेट्रो चालवण्याची चाचणी घेण्यात येईल.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजेश दीक्षित म्हणले कि ‘महामेट्रो लवकरात लवकर पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी मेट्रोची उभारणी अत्यंत वेगाने सुरु आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, इतर सर्व शासकीय संस्थाच्या सहयोगामुळे आणि पुणेकरांच्या उस्फुर्त सहभागामुळे महामेट्रोने हा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या प्रसंगी महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये (IRSE) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.