मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune News : घातपात की अपघात हे चौकशी अहवालात स्पष्ट होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : सीरम संस्थेच्या आग लागण्याच्या घटनेची सखोल चौकशी सुरु आहे. त्यामुळे यामागे घातपात की अपघात हे चौकशी अहवालात स्पष्ट होईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्य सभागृहात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी सीरमचे संस्थापक सायरस पुनावाला, आदर पुनावाला उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाला, जगात कोरोना विषाणुने थैमान घातले. त्यावेळी काळ्याकुट्ट अंधारात आशेचा किरण म्हणजे सीरम संस्था. जेथे कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसचे उत्पादन झाले. त्यामुळे सीरमला आग लागली ही बातमी कळाल्यावर शंका आणि काळजी वाटली की कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे का. पण सुदैवाने कोव्हिशिल्ड जिथे बनविली जाते ते उत्पादन केंद्र, साठा पुर्णत: सुरक्षित आहे. परंतु दुर्दैवाने कालच्या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी सीरमने घेतली आहे.

तरीही आवश्यकता असेल तर राज्यसरकार लागेल ती मदत करेल. जो पर्यंत आगीच्या चौकशीनंतर जो अहवाल येत नाही तो पर्यंत वक्तव्य करणे योग्य होणार नाही. घातपात की अपघात हे चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

रोटाव्हायरस आणि बीसाजी लस उत्पादनांचे कोट्यवधींचे नुकसान : आदर पुनावाला

या पत्रकार परिषदेदरम्यान आगीत झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पुनावाला म्हणाले, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रोटाव्हायरस आणि बीसीजी लस उत्पादन केले जात होते. त्यासाठीचे उपकरणे आणि आधुनिक मशिनरी जळाल्यामुळे किमान एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे नुकसान लवकरच भरून काढू. परमेश्वराची कृपा आहे की कोव्हिशिल्ड उत्पादन केंद्राला कुठलाही धोका पोहोचला नाही. आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Latest news
Related news