Pune News :…आणि मुंबईतून आत्महत्या करण्यास आलेल्या इसमाला पोलिसांनी रोखले

आर्थिक विवंचनेतून केला आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करण्यासाठी मुंबईतून खेड शिवापूर येथे आलेल्या इसमाला पोलिसांनी रोखले व त्याचे प्राण वाचवले. खेड-शिवापुरला कोंढणपूर फाट्यावर विषारी औषध पिण्याच्या तयारीत असतानाच राजगड पोलिसांनी त्याला पकडले. शुक्रवारी (दि.02) हा प्रकार घडला.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर, मुंबई येथून दीपक बस्सी हे शुक्रवारी (दि.02) सकाळी आपली कार घेऊन सुसाईट नोट लिहून साताऱ्याच्या दिशेने निघाले. त्यांचे लोकेशन कात्रज बोगद्याच्या पुढे दाखवत आहे, अशी माहिती शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजगडचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांना मुंबई सायबर क्राईम ब्रँचकडून मिळाली.

घोरपडे यांनी ताबडतोब आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन टोलनाका आणि कोंढणपूर फाट्यावर नाकाबंदी लावली. या काळात मुंबई सायबर क्राईम ब्रॅंचच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी होळकर आणि फौजदार गणेश शिर्के हे राजगड पोलिसांच्या संपर्कात राहून बस्सी यांच्या गाडीचे लोकेशन सांगत होते.

बस्सी हे खेड-शिवापूर येथील दर्गा फाट्यावरून गाडी परत फिरवून कोंढणपूर फाट्यावर आले. त्याठिकाणी एका बाजूला गाडी थांबवून ते विषारी औषध पिण्याच्या तयारीत असतानाच राजगड पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून विषारी औषधाची बाटली घेतली.

बस्सी यांना ताब्यात घेतल्यानंतर राजगड पोलिसांनी हा प्रकार मुंबई सायबर क्राईम ब्रँचला कळवला. त्यांनतर मुंबईहून बस्सी यांचे नातेवाईक खेड-शिवापुरला आले. बस्सी यांच्याकडे चौकशी केली असता आर्थिक कारणातून आत्महत्या करण्याचा विचार होता, असे त्यांनी सांगितले.

राजगड पोलिसांनी बस्सी यांचे मनपरिवर्तन करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, पोलिस हवालदार संतोष कालेकर, अनिल वाघमारे, सचिन कदम, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

याबाबत राजगडचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे म्हणाले, ‘एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुणे-सातारा रस्त्याने कार घेऊन निघाला असल्याची माहिती आम्हाला मुंबई सायबर क्राईम ब्रँचकडून मिळाली होती. त्यानुसार आम्ही तत्काळ नाकेबंदी लावून गाडीच्या नंबरच्या आधारे बस्सी यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ताब्यात घेतले. मुंबई सायबर क्राईम आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एक जणाचा जीव वाचला.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.