Pune News : अण्णा भाऊ साठे आणि महर्षी विठ्ठल शिंदे यांना भारतरत्न द्यावा : रामदास आठवले

एमपीसी न्यूज : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळाला पाहीजे. महर्षी शिंदे यांनी बहुजन, दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली. तसेच साहित्य विश्वात उपेक्षित, दलित, कष्टकरी समाजाचे दुःख, वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही भारतरत्न दिला पाहीजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

महर्षी शिंदे यांनी केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेला 125 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. त्यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृह व ग्रंथालय उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री आठवले बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, नगरसेविका सोनाली लांडगे, नगरसेविका फरजाना शेख, रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, प्राचार्या शिल्पा भोसले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले, महर्षी शिंदे यांनी उपेक्षित व दलित यांना शिक्षण मिळू दिले जात नव्हते त्या काळात त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन संस्था स्थापन करून फार मोठे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यामुळे या वास्तूचा सन्मान होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

तर पुणे कँटोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी या संस्थेचा ठेवा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव एम.डी. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.