Pune News : रमाई आवास योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

एमपीसीन्यूज : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत घर नसलेल्या व बेघर अनुसूचित जाती नवबौध्द प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (महानगरपालिका क्षेत्र) अशी वैयक्तिक घरकुलाची योजना राबविण्यात येते. पुणे शहारातील गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी रमाई आवास योजनेसाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेत आवश्यक कागदपत्रे सादर न केलेले यापुर्वीचे सर्व अर्ज दप्तरी जमा करण्यात येत असून सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी रमाई आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी पुणे महानगरपालिकेत संपर्क साधून नव्याने अर्ज सादर करण्याचे आवाहनही डावखर यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेला जातीचा दाखला, महाराष्ट्र अधिवास दाखला, वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत मर्यादित असलेला दाखला, रेशनकार्ड, अर्जदार यांच्या नावे 30  चौ.मी. घरकुल बांधकामासाठी मोकळी जागा किंवा कच्चे घर असावे. तसेच महानगरपालिका यांनी दिलेला बांधकाम परवाना व शासन निर्णयाप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहीत नमुन्यातील अर्ज तात्काळ पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाकडे सादर करावेत.

याबाबत काही अडचण असल्यास पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका किंवा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन डावखर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.