Pune News : खासगी चारचाकीसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्जाचे आवाहन

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

वाहनांची नविन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते. त्याचा कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो. अनेकदा नागरिकांनाही त्रास होतो. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील, त्यांनी दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नविन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा.

सदर डीडी R.T.O., Pune’ यांच्या नावे नॅशनलाईज / शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. डी. डी. एक महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा. लाईट बील, टेलीफोन बील इ.) तसेच अर्जासोबत अर्जदाराला त्याचे फोटो ओळखपत्राची (उदा. आधार कार्ड / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट / पॅन कार्ड इ.) साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. सदर डीडी किमान रु.301/- रुपयांपेक्षा जास्त तसेच डीडी ‘R.T.O., Pune’ यांच्या नावे नॅशनलाईज / शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा. डीडी ‘Pune R.T.O..’ या नावाने असल्यास तो बाद समजण्यात येईल.

दुपारी 3 नंतर डीडी स्विकारले जाणार नाहीत. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे. कार्यालयामध्ये येणाऱ्या सर्व अर्जदारांनी कोव्हिड-19 च्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.