Pune News: शाळा, महाविद्यालय प्रवेशातील एजंटचे रॅकेट मोडून काढण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करा- संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – शाळा, महाविद्यालय प्रवेशातील एजंटचे रॅकेट मोडून काढण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे केली आहे.

शाळेतील बालवाडी प्रवेशापासून अकरावी, मेडिकल, इंजिनिअरिंग, अशा प्रवेशाचा हंगाम सुरु झाला आहे. या कालावधीत नामांकित महाविद्यालय व शिक्षण संस्था येथे प्रवेश मिळवून देणाऱ्या एजंटचा सुळसुळाट बघायला मिळतो.

हे एजंट गरजू पालकांना हेरतात व विशेषतः परप्रांतीय विद्यार्थी हेरुन त्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवितात. नुकताच एम. डी. प्रवेशासाठी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या रॅकेटमध्ये अनेक वेळा संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा ही सहभाग असतो.

याद्वारे कोट्यवधीची उलाढाल होत असते. या काळात अनेक पावसाळी छत्र्या उगवतात व अनेक निर्ढावलेले तर प्रवेशासाठी ऑफिस देखील थाटतात, असा आरोपही खर्डेकर यांनी केला आहे.

गुन्हा घडून गेल्यानंतर अशांचा शोध घेण्यापेक्षा गुन्हा घडण्यापूर्वीच या गैरप्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केल्यास अनेक प्रकार उघडकीस येतील.

अनेक एजंटचे जाळे उद्ध्वस्त करणे सोपे जाईल. तरी गरजू विद्यार्थी व पालक यांची फसवणूक होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यात विविध संस्थाचालकांची मदत घ्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.