Pune News : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी संस्थेची नियुक्ती !

एमपीसी न्यूज : पुणेकरांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी एका खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरात करोना बाधितांवर डॉ. नायडू, सीओईपी जम्बो कोविड हॉस्पिटल, बाणेर येथील हॉस्पिटल आणि दळवी रुग्णालय येथे उपचार करण्यात येतात. या रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार येथे दाखल होणार्‍या रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

मात्र, हे उपचार करताना कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. परंतु, त्यासाठी कुशल मनुष्यबळ नाही. त्यामुळे सरकारकडून निधी मिळण्याला अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेने कोट्यवधींचे आर्थिक नुकसान देखील होत आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये ‘सेहत इंडिया’ या ठेकेदाराची निविदा अपात्र ठरली आणि ‘रुबी एलीकेअर सर्व्हिसेस’ची निविदा पात्र ठरली.

याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायीच्या मंजुरीनंतर जनआरोग्य योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीला गती मिळू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.