Pune News : सेवाज्येष्ठता डावलून सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती ?

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेमध्ये परंपरा आणि विहीत नियम डावलून कामकाज सुरु आहे. महापालिका आयुक्तांच्या आखत्यारीतील निर्णय खातेप्रमुख घेत आहेत. शेकडो सुरक्षा कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून सहायक सुरक्षा अधिकारी पदांवर प्रभारी नेमण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋषीकेश बालगुडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे पुणे महापालिकेच्या विविध विभागामध्ये एकूण 370 सुरक्षा रक्षक पदावर कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु सेवाज्येष्ठतेनुसार पदभार देण्याऐवजी सेवाज्येष्ठता डावलून दोन कर्मचाऱ्यांची प्रभारी सहायक सुरक्षा अधिकारी पदांवर नियुक्ती करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा विभागाच्या खातेप्रमुखांनी सेवाज्येष्ठता डावलून कोणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप पत्रात केला आहे.

हे पद निर्माण करताना पीएमसी 3014/प्र.क्र.02, नवि 22 या 26 ऑगस्ट 2014 रोजीच्या शासननिर्णयानुसार या नेमणुका चुकीच्या असल्याचा दावा बालगुडे यांनी केला आहे. या नेमणुका करताना कार्यालयीन परिपत्रक काढणे गरजेचे होते पण ही प्रक्रिया केली नसल्याचे दिसून आले आहे. तरी या संबंधित नियुक्ती प्रकरणाची चौकशी करून स्थगिती द्यावी, अशी मागणी बालगुडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.