Pune News : बालगंधर्व कलादालन येथे आर्ट मॅजिक चित्रकला प्रदर्शन ; 19 मार्च पर्यंत प्रदर्शन

एमपीसी न्यूज – विविध ऋतूमधील निसर्गाचे अद्भूत रंग, वाराणसीतील घाट तेथील साधू आणि मंदिरे, चित्रातून साकारलेली मधूबनी चित्र शैली, स्त्री भावनेचे विविध कंगोरे, विविध प्रकारचे गणपती आणि देवतांची चित्रे, भारतातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे अशा विविध चित्रातून भारतीय संस्कृतीचे दर्शन आर्ट मॅजिक चित्रप्रदर्शनातून घडले. पारंपरिक चित्रकलेपासून ते मॉडर्न आर्ट चित्रशैली पाहण्याची संधी यावेळी पुणेकरांना मिळाली.

आर्ट मॅजिक क्लासेसच्या वतीने 14 व्या आर्ट मॅजिक कलाप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध चित्रकार उल्हास वेदपाठक,ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, आर्ट मॅजिकच्या संचालिका महालक्ष्मी पवार आणि संयोजक अंबादास पवार, कृतिका कामदार, सागर दारवटकर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, रेहान बाबुडे यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शनात कॅनव्हासवर संगीत, नृत्य आणि वारली चित्र तसेच आफ्रिकन जीवनशैली धाग्यांनी साकारण्यात आलेली चित्रे आहेत. मोर, घुबड, चिमण्या, पोपट अशा पक्षांचे साकारलेले गोल्डन पेंटींग,तसेच डेंटी पावडर चा वापर करुन विविध वस्तूंची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पेन्सिल, गवत, काड्या, रेझीन यांचा वापर करुन काढण्यात आलेली चित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

महालक्ष्मी पवार म्हणाल्या, पाच वर्षाच्या मुलापासून साठ वर्षांच्या चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात आहेत, हे या प्रदर्शनाचे वेगळेपण आहे. मोझॅक ग्लास पेटिंग, कॉफी पेटिंग, ऑइल, अ‍ॅक्रेलिक, कलर पेन्सिल,चारकोल, पोट्रेट या माध्यमातील विविध चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक 19 मार्च पर्यंत सकाळी 11 ते 8 या वेळेत प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.