Pune News : कलाकारांचे ‘उपोषणास्त्र’ उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘म्यान’

0

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी अभिनेते कुमार पाटोळे यांनी आजपासून ( बुधवार) बालगंधर्व रंगमंदिर येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, कलाकारांच्या मागण्यांचा रास्त विचार केला असून सांस्कृतिक विभागाशी बोलून लवकरात लवकर या बाबत सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.

महाकला मंडळामधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले आहेत.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ऍड मंदार जोशी, अशोकराव जाधव यांनीही उपोषणाला बसून पाठिंबा दिला.

महाराष्ट्रातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्मिते, संस्था यांची शासन दरबारी नोंद करावी, कलाकारांचा आरोग्य विमा ( medical policy) काढून द्यावा, कलाकारांची वसाहत वसविण्यासाठी शासनाकडून कमीत कमी दरात एखाद्या भूखंडावर कलाकरांना घरे बांधून द्यावी, ”म्हाडा”मध्ये कलाकारांना घर घेण्यासाठी सवलत मिळावी, शासनाने कलाकारांना जे मानधन देऊ केलंय त्यासाठीची सध्याची वयोमर्यादा 60 वर्षे आहे. ती वयोमर्यादा कमी करून द्यावी, शासनाकडून प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन (pension) मिळावी, अशा अनेक मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

चित्रपट, नाट्य, कलापथक, मराठी वाद्यवृन्द, हिंदी वाद्यवृन्द, लोककलावंत वाघ्यामुरुळी, गोंधळी, तुतारीवाद्क, हलगीवादक, भारुड कलावंत, आदिवासी कलावंत, कळसूत्री बाहुली कलावंत, बहुरूपी तसेच शाहिरी कलावंत, तमाशा कलावंत, कलाकेंद्र चालविणारे कलाकार, भजनी मंडळे, बँड पथक, तंत्रज्ञ विभाग तसेच विदर्भ, गडचिरोली येथील कला सादर करणारे नाट्य कलाकार, जादूगार, बोलक्या भाहुल्यांचा खेळ करणारे कलावंत, पंजाबी ढोल पथक यांचाही या आंदोलनात सहभाग आहे.

दरम्यान, कलाकारांनी महाराष्ट्र घडवलेला आहे त्या कलाकारांच्या मागण्यांचा रास्त विचार केला असल्याने सांस्कृतिक विभागाशी बोलून लवकरात लवकर या बाबत सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.