Pune News : पुण्यातील अस्पायर एफसीची गोकुलमशी विकास भागीदारी;या भागीदारीने अस्पायरला एक नवी ऊर्जा मिळेल

एमपीसी न्यूज –  पुण्यात नव्याने सुरू झालेल्या अस्पायर फुटबॉल क्लबला भारतीय महिला लीगमधील चॅंपियन गोकुळम केरळा एफसीची (जीकेएफसी) साथ मिळाली असून, या दोन्ही क्लब दरम्यान २०२२ – २३ च्या मोसमा दरम्यान विकास भागीदारी करार करण्यात आला आहे.

 

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) महिला लीग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या महिला लीगमध्ये अस्पायर पदार्पण करेल.

 

या नव्या विकास भागीदारी कराराबद्दल बोलताना जीकेएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कुमार म्हणाले,’आम्ही गोकुळममध्ये महिला फुटबॉलला प्राधान्य देतो. समानतेच्या तत्वाज्ञानानुसार आम्हाला जेवढे शक्य आहे, तेवढे आम्ही महिला फुटबॉलसाठी सहकार्य करतो. अस्पायर एफसीकडून जेव्हा आमच्या संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांचा दृष्टिकोन आमच्या विचारांशी जुळत असल्याचे जाणवले. आमच्या अकादमीमध्ये खेळाडू मार्गदर्शन घेतात आणि दृष्टिकोन,  संधी आणि प्रेरणा यांच्या पलिकडे जाऊन विचार करतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी महिला फुटबॉलचा विकास या विचारातून हातमिळवणी केली.’

 

अस्पायर एफसी हा एक युवा खेळाडूंचा संघ आहे. संघातील खेळाडूंचे सरासरी वय १८ वर्षाच्या आसपास आहे. आमच्या विचारांशी त्यांचे विचार जुळून आले. महिला फुटबॉलचा विकास हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच आमच्यातला करार पूर्णत्वाला जाऊ शकला. ही भागीदारी भविष्यात निश्चितपणे वाढेल,  असा विश्वासही अशोककुमार यांनी व्यक्त केला.

 

या भागीदारीचा महत्वाचा फायदा म्हणजे अस्पायर एफसीच्या खेळाडूंना दक्षिणेतील जीकेएफसी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर विचारांच्या देवाणघेवाणीतून अस्पायरला पुढे जाण्याचा नवा मार्ग मिळेल.

 

अस्पायर एफसीचे सह संस्थापक आणि सचिव श्रीकांत अय्यर म्हणाले, ‘या भागीदारीमुळे आमच्या खेळाडूंना प्रशिक्षणाचा एक नवा मार्ग मिळेल. गोकुलमबरोबर काम करताना सर्व व्यावसायिक पातळीवर आम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळणार आहे. ही भागीदारी म्हणजे शिकण्याचे एक चक्र आहे. जीकेएफसी क्लब हा आशियातील एक आघाडीचा महिला फुटबॉल क्लब आहे. त्यांच्याशी आमचे नाते जोडले गेल्यामुळे खेळाडूंना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आमची विनंती मान्य केल्यामुळे आम्ही जीकेएफसीचे मनापासून धन्यवाद मानतो.

 

पुण्यातील महिला फुटबॉलने आता कुठे तग धरायला सुरवात केली आहे. या प्रवाहात एक भक्कम संघ बनण्यासाठी आम्ही संधी शोधत होतो. याच विचाराने आम्ही जीकेएफसीशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ही भागीदारी नक्कीच अस्पायरला एक नवी ऊर्जा देईल, असेही अय्यर म्हणाले.

 

नुकत्याच झालेल्या जिल्हा अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत अस्पायर एफसी संघातील पाच खेळाडूंंची पुणे जिल्हा संघात निवड झाली होती. या स्पर्धेत पुणे उपविजेते ठरले होते.

 

अस्पायरविषयी….
अस्पायर एफसी हा महाराष्ट्रातील पुणे स्थित एक महिला फुटबॉल क्लब आहे. हा क्लब पुणे जिल्हा फुटबॉल क्लबशी संलंग्न आहे. अस्पायर इंडियाच्या वतीने हा क्लब चालवला जाते. अस्पायर इंडिया ही एक क्रीडा व्यवस्थापन संस्था असून, त्यांचा फुटबॉल हा एक मुख्य भाग आहे. फुटबॉलसारख्या ‘ब्युटिफुल गेम’च्या स्पर्धात्मक पातळीवर आगेकूच करण्यासाठी एक निश्चित मार्ग खेळाडूंना आखून द्यायचा हा या क्लबचा प्राथमिक आणि एकमेव हेतु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.