Pune News : पाण्याचे ऑडिट करून महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडा – आबा बागुल

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात अनियमित आणि असमान पाणीपुरवठा होत आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या घरामध्ये वेळी अवेळी पाणी येते, रात्री बेरात्री उठून अर्धा तास येणारे पाणी भरणे,यासह पाण्याशी निगडित अनेक समस्या पुणेकरांना सतावत आहे. या समस्यांचे मूळ जाणून घेण्यासाठी व पुणेकरांवरील अन्याय टाळण्यासाठी पाण्याचे ओपन ऑडिट करून ते महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडले जावे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पुणे शहरात पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. काही भागात नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी पुरविले जाते, टँकरभोवती गर्दी करून पाणी भरले जाते, सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ही गर्दी घातक आहे.

परंतु, सामान्य पुणेकरांना नाईलाजाने गर्दीतच पाणी भरावे लागते. त्याच वेळी आलिशान इमारती, मॉल्स, मोठे बंगले, सुपर शॉपी अशा वास्तूंना मुबलक पाणीपुरवठा होताना दिसतो. यामागचे नेमके कारण लक्षात येत नाही, असे बागुल म्हणाले.

खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यातून 14 टीएमसी पाणी शहराला पुरविले जाते. राज्य सरकारमार्फत पाणीवाटपाचे नियोजन केले जाते. 14  टीएमसी पाण्यापैकी 8 टीएमसी पाण्याचाच हिशेब लागतो. उर्वरित पाणी कोणाला दिले जाते हे गुलदस्त्यात आहे.

पाणी पुरवठ्याच्या 24  बाय 7  योजनेखाली पाणीपट्टी वाढवायची पण सामान्य पुणेकराला त्यानुसार सेवा द्यायची नाही.

हॉटेल्स, मॉल्स, टाऊनशिप या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा करायचा याचे गौडबंगाल पुणेकरांसमोर उघड होणे गरजेचे आहे. याकरिता पाणी पुरवठ्याचे ओपन ऑडिट करून महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडावे, जनतेसमोर खुले करावे, अशी मागणीही बागुल यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.