Pune News : ‘हृदय संगीत’ हाऊसफुल

एमपीसी न्यूज : वर्षभरानंतर झालेल्या ‘हृदय संगीत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सदाबहार गीतांनी सजलेल्या शांततारसाची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. लॉकडाऊननंतर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमासाठी प्रेक्षागृह हाऊसफुल झाले. हे बघून पंडित हृदयनाथ मंगेशकर भारावून गेले आणि टाळ्या वाजवत त्यांनी रसिकांना अभिवादन केले. पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.

पृथ्वीराज थिएटर्स आयोजित आणि मनिषा निश्चल महक निर्मित व प्रस्तुत ‘हृदय संगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडीत हृदयनाथ मंगेशकर, डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल, वंडरबॉय पृथ्वीराज यांच्या सदाबहार गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरवात ही पंडितजींनी ‘गगन सदन तेजोमय’ या गीताने केली. यावेळी त्यांनी कोरोनाचा अंधकार संपून नवीन पहाट होत असल्याचे मत व्यक्त केले. वंडरबॉय पृथ्वीराजच्या ‘नको देवराया अंत आता पाहू’ व ‘जिवा-शिवाची बैलजोड’ या गीतांनी रसिकांची मने जिंकली.

_MPC_DIR_MPU_II

गेले काही महिने सगळेच घरात बसून आहेत. परिस्थिती आता पूर्ववत होत असताना रसिक आता कार्यक्रमाला येतील का अशी शंका होती. पण श्रोते एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याने त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. यां उदंड प्रतिसादामुळे सगळ्यांनाच नवसंजीवनी मिळेल. मी जवळपास वर्षभरानंतर हार्मोनियम घेऊन रंगमंचावर बसलो, त्यामुळे गाता येईल का याची शंकाही मनात होती, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

राधा आणि मनीषा यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रम टिपेला गेला. त्यांनी रसिकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व उच्च निर्मिती मूल्य असलेला ‘हृदय संगीत’ कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमात पंडितजींनी लता मंगेशकरांना फोन लावला. लतादीदींनी प्रेक्षकांच्या प्रतिसादाला उत्स्फूर्तपणे दाद देत पृथ्वीराजचे कौतुक केले. कोरोना काळात बाळ हृदयनाथला ऐकायला आलात, असे म्हणून त्यांनी रसिकांचेही आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.