Pune News : ‘बजाज ऑटो’ची महाराष्ट्राशी बांधिलकी !; चाकणमध्ये करणार 650 कोटींची गुंतवणूक

एमपीसीन्यूज  : दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची ‘बजाज ऑटो’ ( Bajaj Auto)  कंपनी आता महाराष्ट्रात नवीन  उत्पादन प्रकल्प उभारणार  असून, त्यासाठी 650 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबाबत राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

ज्या राज्यातून आमच्या प्रवासाची सुरूवात झाली त्या राज्याशी असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून ही गुंतवणूक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

बजाज ऑटो चाकणमध्ये हा नवीन उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून येत्या 2023 पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन घेण्यास सुरूवात होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. कंपनीचा 75 वा वर्धापन दिन साजरा होत असणाऱ्या वर्षी ही गुंतवणूक करण्यात आल्याचे कंपनीकडून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले.

बजाज ऑटोच्या चाकण येथील या नवीन प्रकल्पात KTM, Husqvarna आणि Triumph या मोटरसायकल्सचे उत्पादन घेण्यात येणार आहे. तसेच नवीन चेतक ( chetak) या  इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादनही याच प्रकल्पात होणार असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने वर्षभरात विविध उद्योगांशी एकूण दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार केले. त्यात मंगळवारी विविध उद्योगांसोबत केलेल्या 25 करारांचा समावेश आहे.

या करारांद्वारे राज्यात सुमारे 61 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून अडीच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.