Pune News : पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील बंदी हटवा; आमदार सुनील शेळके यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांवर आधारित लहान-मोठ्या व्यवसायांवर परिणाम झाला असून, स्थानिक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील बंदी हटवा, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार, दि. 20) विधानभवन, पुणे येथे कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी आमदार सुनील शेळके यांनी पर्यटनस्थळांवरील बंदी हटवण्याची मागणी केली. बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

‘पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवरील बंदी हटवून, पर्यटकांसाठीचे नियम शिथिल करावे व स्थानिकांना दिलासा द्यावा.’ अशी विनंती आमदार शेळके यांनी अजित पवार यांना केली. यावर ‘पर्यटनस्थळांवरील बंदी उठवुन पर्यटकांना कशा पद्धतीने मुभा देण्यात येईल, याबाबत येत्या आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटक येत असतात. पर्यटनाचा तेथील स्थानिक अर्थकारणात मोठा वाटा असतो. तसेच, अनेकांना उपजिविकेचे विविध पर्याय उपलब्ध होतात. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात पर्यटकांना पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घातली आहे. स्थानिक व्यावसायिक, छोट्या-मोठ्या व्यावसायांवर याचा मोठा परिणाम झाला असून, यामुळे पर्यटनस्थळावरील एकंदर अर्थकारणाला खिळ बसली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले होते. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षीपासून कोरोना व पर्यटनस्थळांवरील बंदीमुळे मोठा आर्थिक फटका स्थानिकांना बसला आहे. मावळातील पर्यटन बंदीमुळे पर्यटकांवर आधारित लहान-मोठ्या व्यवसायांवर उपजीविका असणारे स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ऐन पावसाळ्यात पर्यटनास बंदी असल्याने अनेकांना उत्पन्नाचा स्त्रोत राहिला नाही. येथील अनेक भागातील अर्थकारण पर्यटन, पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय होणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.