Pune News : विद्यापीठात ‘बीबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोग्राम’ अभ्यासक्रम

संचेती हेल्थकेअर अकॅडमी सोबत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संचेती हेल्थकेअर अकॅडमी यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत विद्यापीठात लवकरच ‘बीबीए इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोग्राम’ हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर बुधवारी, 8 सप्टेंबर 2021 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, ‘स्कुल ऑफ इंटरडीसिप्लिनरी सायन्सेस’ चे संचालक डॉ. अविनाश कुंभार, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. पराग संचेती आदी यावेळी उपस्थित होते.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानुसार अद्ययावत व व्यवस्थापनाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विदयार्थ्यांना प्रात्यक्षिकाची संधीही मिळणार आहे. या शैक्षणिक वर्षापासूनच या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जाणार असून याची माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

आरोग्य क्षेत्रात चांगले व्यवस्थापन असणे ही काळाची गरज झाली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राशी निगडित कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.