Pune News : सावधान ! पुण्यात चार ठिकाणी सूक्ष्म कंटेन्मेंट झोनची शक्यता

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. मात्र, येत्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास शहराच्या काही भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे (मायक्रो कंटेंमेंट झोन) करावे लागतील, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि सभागृह नेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

महापौर मोहोळ म्हणाले, करोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे पुणेकरांनी मास्क, सॅनिटायजर आणि सुरक्षित वावर या करोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे. शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत.

गेल्या आठवड्यात 1300 च्या आसपास असलेली करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1700 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हीटी दरही 4.6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे. नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढत आहे.

त्यामुळे या ठिकाणची चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ससूनसह पालिकेच्या रुग्णालयात 1163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, खासगी रुग्णालयांना खाटा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.