Pune News : घराभोवती फिरत असल्याचा जाब विचारल्याने कुटुंबाला मारहाण; मुलाला उचलून जमिनीवर आपटले

एमपीसी न्यूज – घराभोवती फिरणाऱ्या तरुणांना जाब विचारल्यावरून दोन तरुणांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. तसेच 12 वर्षाच्या मुलाला उचलून जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्रांतवाडी परिसरात रविवारी (दि.15) हा प्रकार घडला.

याप्रकरणी प्रमोद ऊर्फ मुन्ना कांतिलाल गायकवाड (वय 20, रा. भीमनगर, धानोरी, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. तर, त्याचा दुसरा साथीदार पळून गेला. याप्रकरणी रमाकांत साळवी (वय 40, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धानोरी रोड येथील पत्र्याची चाळ परिसरात राहतात. रविवारी सायंकाळी त्यांच्या घराभोवती आरोपी गायकवाड व त्याचा साथीदार बराच वेळ घुटमळत होते. त्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबातील महिलांनी त्यांना तेथे फिरण्याचा जाब विचारला. त्यावेळी अंगणात झोपलेले फिर्यादीचे नातेवाईक राजेश काकडे यांची आरोपीसमवेत बाचाबाची झाली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी, त्याचा साथीदार व त्यांच्या कुटुंबातील लोक एकत्र आले. आरोपीने त्याच्या हातातील जाड धारदार काचेने फिर्यादीच्या डोक्यात वार करीत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी फिर्यादीला कोयत्याने मारण्यास जात असतानाच फिर्यादीची आई सीताबाई यांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने सीताबाईच्या हातावर कोयत्याने वार करून त्यांनाही जखमी केले.

त्याचवेळी तेथे थांबलेल्या फिर्यादीच्या 12 वर्षांच्या पुतण्याला उचलून जमिनीवर जोरात आपटले. त्यामुळे फिर्यादीच्या पुतण्याच्या हाताला जबर दुखापत झाली.

या घटनेनंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत परिसरात दहशत निर्माण केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.