Pune News : एलजीबीटी’ समुहासाठी पुण्यात प्रथमच ‘ब्युटी पार्लर कोर्स’

'स्माईल', 'पुणेरी प्राईड फाऊंडेशन' आणि 'यार्दी ग्रुप'चा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – खासदार वंदना चव्हाण यांच्या ‘स्माईल’ फाऊंडेशनने घेतलेल्या पुढाकारातून ‘एलजीबीटी’ समुहाच्या पहिल्या तुकडीने ब्युटी पार्लरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला असून मंगळवारी खा. वंदना चव्हाण यांच्या हस्ते या तुकडीतील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी ‘पुणेरी प्राईड फाऊंडेशन’च्या संचालक प्रेरणा वाघेला, ‘लीज् इंटरनॅशनल ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूट’च्या संस्थापक संचालक लिना खांडेकर आणि ‘यार्दी ग्रुप’च्या भारती कोतवाल या उपस्थित होत्या.

पुरोगामित्वाचा केवळ जप न करता प्रत्यक्ष कृती करण्याचं कौतुकास्पद कार्य खा. वंदना चव्हाण यांच्या पुढाकारातून झाले. ‘एलजीबीटी’ समुहाला समाजात सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ‘स्माईल’, ‘पुणेरी प्राईड फाऊंडेशन’ आणि ‘यार्दी ग्रुप’ने या समुहासाठी ‘बेसिक मेकअप कोर्स’ तयार केला. कर्वे रोड येथील ‘लीज् इंटरनॅशनल ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूट’ने या कोर्सनुसार ‘एलजीबीटी’ समुहाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आणि नुकताच सात जणांनी हा दोन महिन्यांचा कोर्स यशस्वीपणे पूर्णही केला. या सर्वांना आज प्रशस्तीपत्रे देण्यात आले. हा कोर्स पूर्ण केल्यामुळे ‘एलजीबीटी’ समुहाला स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल किंवा नोकरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

‘एलजीबीटी’ समुहाला समाजात बरोबरीची वागणूक मिळावी, यासाठी जून महिना ‘प्राईड मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘बेसिक मेकअप कोर्स’ पूर्ण केलेल्या ‘एलजीबीटी’ समुहातील मंडळींना प्रशस्तीपत्र देण्याची संधी मिळाली, ही खरोखरच अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी खा. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली. ‘बेसिक मेकअप कोर्स’च्या दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षणही लवकरच सुरू होईल, त्याचा लाभ अधिकाधिक मंडळींनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.