Pune News: सावधान ! मास्क न लावता घराबाहेर पडाल तर…

पुणे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या सूचना आणि विभागीय आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-यांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. पुणे शहरात पोलीस कारवाई करीत आहेत. तर पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत आहेत. मास्क न घालता घराबाहेर पडणा-यांवर 500 रुपयांचा दंड आकारला जात आहे. ही कारवाई दंड वसूल करण्यासाठी केली जात नसून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केली जात आहे. कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून हा उपाय केला जात आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मास्क वापरण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. पुणे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग कारवाई करीत आहेत.

मास्क न घातल्याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांशी हुज्जत घातल्यास तसेच दंड न भरल्यास गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. तसेच कारवाईची ही मोहीम पिंपरी-चिंचवड शहरात देखील सुरु झाली आहे. महापालिकेकडून नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

मास्क न घालणा-या व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर त्या व्यक्तीला पावती दिली जाते. त्यामध्ये व्यक्तीचे नाव, दंडाचे कारण, दंड आकारलेली जागा यांचा उल्लेख केला जातो. पावतीशिवाय दंड आकाराला जात नाही. ज्या व्यक्तींकडे मास्क नाहीत. तसेच जे नागरिक जाणीवपूर्वक मास्क घालत नाहीत, अशांवर प्राधान्याने कारवाई केली जाते.

दंडात्मक कारवाई करताना नागरिकांशी संवाद साधून मास्कच्या वापराबाबत जनजागृती देखील केली जाते. एखादी व्यक्ती मास्क न घालता जात आहे. त्या व्यक्तीसोबत कुणीही नाही, यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे. अशा वेळी संबंधित व्यक्तीला मास्क घालण्याची सूचना दिली जाते. सूचना देऊनही त्या व्यक्तीने मास्क घातला नाही, तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 28 ऑगस्ट 2020 रोजी आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे की, मास्क न घालता फिरणा-या नागरिकांवर 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारावा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून दंड आकारण्यात यावा, असे आदेशात म्हटले होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “पुणे जिल्हयातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरतांना आपल्या तोंडावर मुखपटटी (मास्क) घालणे आवश्यक आहे.

मुखपटटी (मास्क) न घालता नागरिक फिरतांना दिसतात. अशा नागरिकांमुळे कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना देण्यात आले आहेत.”

पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, “दिवसेंदिवस पुणे शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क न घालणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

नागरिकांना दंड करणे हा या कारवाईचा उद्देश नाही. तर घराबाहेर पडताना स्वतःचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यासाठी तसेच नागरिकांना याची सवय लागावी यासाठी ही कारवाई केली जात आहे.

याबाबत पुणे पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस नागरिकांना मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. मास्क न घालणा-यांवर दंड आकारला जातो. त्याची रितसर पावती देखील संबंधित नागरिकाला दिली जात असल्याचे सह आयुक्त शिसवे म्हणाले,

पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मास्क न वापरणा-या लोकांवर कारवाई केली जात आहे. महापालिकेने यासाठी पथके तयार केली आहेत. त्यांना पोलीस सहकार्य करीत आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.