Pune News : पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहा – महावितरण

एमपीसी न्यूज – मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी अस्तित्वात आहे. मकरसंक्रातीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी पतंग उडविताना पंतग किंवा मांजा या वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

नागरिक किंवा लहान मुलांना वीजयंत्रणेमध्ये अडकलेला माजा किंवा पंतग काढताना विद्युत अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

वीजप्रवाह सुरु असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. लोखंडी सळई किंवा काठ्यांद्वारे पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते.

याशिवाय पतंगाच्या मांज्यामध्ये धातुमिश्रीत कोटींग असल्यामुळे विजेचा धक्क्याने विद्युत अपघातामध्ये जिवितहानी तसेच वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असतो.

नागरिक व विशेषतः लहान मुलांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे.

कोणत्याही परिस्थितीत वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. अतिशय सुरक्षितपणे व वीजयंत्रणेपासून सतर्क राहून सावधगिरी बाळगत पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.