Pune News : ‘भद्रकाली’ – मराठा साम्राज्याच्या वीरांगनेची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

0

एमपीसी न्यूज – शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती ‘श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे’ यांच्यावर आधारित ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘भद्रकाली’ ही कलाकृती साकारण्यासाठी मराठी सिने-सृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वं प्रथमच एकत्र येणार आहेत.

ब्लॉकस्टर ठरलेला ‘मुळशी पॅटर्न’ व आगामी ‘जग्गु आणि Juliet’ या चित्रपटांचे निर्माते पुनीत बालन आणि सुपरहिट चित्रपट ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि आगामी ‘पावनखिंड’या सिनेमांचे लेखक दिग्पाल लांजेकर, तसेच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या ‘कच्चा लिंबू’ आणि सुपरहिट ‘हिरकणी’ सारख्या चित्रपटांचे तसेच आगामी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे ‘यशस्वी’ दिग्दर्शक प्रसाद ओक आणि संगीतातील जादूगार अजय-अतुल यांच्या एकत्रित कामातून साकारणार एक अद्भुत कलाकृती!

_MPC_DIR_MPU_II

शिवराज्याभिषेकदिनाच्या मुहूर्तावर ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाची गोष्ट आठराव्या शतकातील छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील, मराठा साम्राज्यातील एका अशा वीरांगनेची आहे जी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याची एकमेव महिला सरसेनापती ठरली. खुल्या मैदानातील युद्ध अफाट शौर्याने जिंकल्यामुळे आधुनिक काळातील त्यांचे कर्तृत्त्ववान स्त्री म्हणून महत्त्व अधोरेखित होते. अद्भुत असं शौर्य गाजवणाऱ्या या लढवय्या ‘श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे’ यांचा उल्लेख ‘भद्रकाली’ असा का झाला? याचा रंजक इतिहास म्हणजे ‘भद्रकाली’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट.

चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होत असून उमाबाईसाहेब यांचे वंशज, ‘श्रीमंत सेनाखासखेल सरसेनापती सत्यशीलराजे दाभाडे’ यांची ऐतिहासिक संदर्भांसाठी वेळोवेळी बहुमोल मदत होत आहे. लेखक दिग्पाल लांजेकर यांची प्रभावी लेखणी कायमच आपल्याला प्रत्यक्ष इतिहासात घेऊन जाते आणि तो चित्रपट संपेपर्यंत तो कालखंड आपण प्रत्यक्ष जगत राहतो! शिवाय सुपरहिट ठरलेल्या ‘हिरकणी’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा अनुभव असलेले दिग्दर्शक प्रसाद ओक यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांच्या ‘म्युझिक’ मुळे ‘भद्रकाली’ Larger than life ठरेल यात शंका नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment