Pune News : पुण्यात भारत बंदला सुरुवात !

एमपीसी पुणे : कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेनं निषेध व्यक्त करत दुकाने बंद ठेवण्याची विनंती करत आंदोलन करत आहे.

पुण्यात भारत बंद काही प्रमाणात पाळला जात आहे. मार्केट यार्ड सुरू असलं तरी फक्त भाजीपाला विभाग सुरू आहे. कांदा बटाटा आणि भुसार माल विभाग बंद राहणार आहे. तसंच सकाळी अकरा वाजता शहरातील अलका चौकातून सर्व शेतकरी, कामगार संघटना, माकप, भाकप आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संयुक्त महामोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात व्यापारीही सहभागी होणार आहेत. दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे.

वंचित आघाडी, आप, संभाजी ब्रिगेडचाही पाठिंबा…
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारत बंदला वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. आजच्या ‘भारत बंद’ला ‘आप’नेही पाठिंबा दिला असून बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हा बंद शांततेने यशस्वी करण्याचे काम करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.