Pune News: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला गती : महापौर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वतीने प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यासाठी पुणे महापालिका आणि पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली.

वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये तीन करार करण्यात आले. या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, मालमत्ता उपायुक्त राजेंद्र मुठे, सामन्य प्रशासन विभागाचे सुनील इंदलकर, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्यप्रमुख अंजली साबणे, विधी अधिकारी ॲड. मंजुषा इधाटे, ॲड. निशा चव्हाण उपस्थित होते.

या संदर्भात सविस्तर माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, “महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’कडून आलेल्या निर्देशानुसार कमला नेहरू हॉस्पिटल आणि वैद्यकीय शिक्षण ट्रस्टमधील करारनामा, तसेच मालमत्ता व्यवस्थापन व वैद्यकीय शिक्षण ट्रस्टसाठी देत असलेल्या जमिनीकरता करारनामा आणि पुणे महानगरपालिका व वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यामधील करारनामा या तिन्ही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करत मान्यता दिली आहे.’

वैद्यकीय महाविद्यालय वेगाने प्रत्यक्षात साकारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असून तांत्रिक बाबींचाही पाठपुरावा जलद गतीने केला जात आहे. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयाचे बोधचिन्ह तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे, असेही महापौर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

ट्रस्टमध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांचाही समावेश : महापौर मोहोळ

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टमध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांचाही समावेश करण्यात आला आले. तसेच शहर अभियंता, मुख्यलेखापाल, मालमत्ता उपायुक्त, मुख्य विधी अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षक यांचाही समावेश ट्रस्टमध्ये सभासद म्हणून करण्यात आला असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.