Pune News : राजशिष्टाचार टाळून भुजबळांनी चाखली कष्टाची भाकरी अन् झुणक्याची चव !

एमपीसी न्यूज : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राजशिष्टाचार टाळून ‘हमाल पंचायत ‘ संचलित ‘कष्टाची भाकर’ उपक्रमास भेट देऊन झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. झुणक्याची चव आवडल्याने त्यांनी तो पुन्हा मागवून खाल्ला.

हमाल पंचायतच्या ‘कष्टाची भाकर’ या उपक्रमास सवलतीच्या दरात धान्य पुरवठा केला जात होता. गेल्या वर्षीपासून तो बंद केला गेला आहे. सवलतीच्या दराने धान्य पुरवठा पुर्ववत करावा, या मागणी संदर्भात मंत्री भुजबळ आणि जेष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांची चर्चा झाली.

चर्चेमधे बाबा आढाव यांनी सद्य:परिस्थितीचा आढावा भुजबळ यांना दिला. त्यानंतर मंत्री भुजबळ यांनी धान्य पुरवठा कसा सुरळितपणे चालु करता येईल याबाबत लवकरच संबंधित अधिकारी व आढाव यांच्यामधे संयुक्तरित्या चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

धान्य पुरवठा हा केंद्र सरकारकडून होत असतो. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन बाबांनी एक पर्याय दिला तर सदर विषयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे सोपे होईल, असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नागरे, खजिनदार विजय चोरघे हमाल पंचायत कष्टकरी भाकरीचे चंद्रकांत मानकर, दिलीप मानकर, गोरख मेंगडे तसेच अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.