Avinash Bhosale Arrested: पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसले यांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक (Avinash Bhosale Arrested) करण्यात आली आहे. डीएचएफल प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.

Pune News : लोहगाव विमानतळाजवळ आकाशात प्रखर लाईट सोडण्यास बंदी

काही दिवसांपूर्वीच भोसले यांच्या घरावर छापा

येस बॅंक,डीएचएफएल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणांवर 30 एप्रिलला शोध मोहिम राबविली होती.पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विवेक गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले होते.

सीबीआयने याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय छाबरिया यांना अटक केली होती. छाबरिया 6 मेपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत.छाबरिया हे रेडिअस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. डीएचएफएलमधून त्यांनी मोठे कर्ज घेतले होते.त्यातील तीन हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मार्च 2020 मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

अविनाश भोसले कोण आहेत?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यवसायिक म्हणून पुण्यासह राज्यात ओळख आहे. तसेच ते काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. एवढेच नाही तर अविनाश भोसले यांचे सगळ्याच पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या कारवाईमुळे भोसले अडचणीत सापडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.