Pune News: भटक्या कुत्र्यांनी फाडले दुचाकीचे सीट कव्हर

एमपीसी न्यूज – विधी महाविद्यालय रस्त्यावरील शांतीशीला सोसायटीत पार्किंगमधे घुसून भटक्या कुत्र्यांनी दुचाकीचे सीट कव्हर फाडले. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. 

लॉकडॉउनच्या काळात दिवसरात्र रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार होता. या काळात ते अतिशय हिंस्र झाल्याचे जाणवते. कोथरूडमध्ये हा प्रादुर्भाव आणि मुक्त संचार प्रमाणाबाहेर वाढला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावर राहणारे प्रथमेश मुजुमदार यांना भटके कुत्रे चावले. अद्यापही ते उपचार घेत आहे. असाच अनुभव सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनाही शहीद ताथवडे उद्यान, कर्वे शिक्षण संस्था व समर्थ पथावर आला आहे.

दुचाकीच्या मागे धावणे, भुंकणे अश्या कृत्यांमुळे त्यांची भीती वाटते. काही प्राणीमित्र रोज खाऊ घालतात. त्यामुळे या कुत्र्यांना विनासायास अन्न उपलब्ध होत असल्याने ते दिवसभर पदपथावर घाण करतात. रात्री, पहाटे पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या, दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. विधी महाविद्यालय रस्त्यावरील शांतीशीला सोसायटीत तर इमारतींच्या पार्किंग मधे घुसून दुचाकीचे सीट कव्हर फाडणे,सर्वत्र घाण करणे अशी कृत्ये ही भटकी कुत्री करतात.

प्राणीमित्रांचा दबाव आणि प्राणी कायदा क्रौर्य प्रतिबंधक कलम ३८ अन्वये या हिंस्र कुत्र्यांवर कारवाईस मनपा कर्मचारी धजावत नाहीत.

या जनहिताच्या विषयात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वकीलांनी पुढे यावे. एकदाच फैसला घ्यावा की माणसाचा जीव महत्त्वाचा की जनावरांचा, असे आवाहनही क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.