Pune News : जन्म – मृत्यू दाखले वेळेत मिळत नाहीत, आयुक्तांनी लक्ष घालावे : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – मार्च 2020  कोरोना आल्यापासून पुणेकरांना जन्म व मृत्यू दाखले वेळेत मिळत नाही. प्रशासकीय कामकाजासाठी सेवक वर्ग नसल्याने जन्म व मृत्यू दाखले मिळत नसल्याचे उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केले आहे.

पुणे महानगरपालिकेचे जन्म व मृत्यू दाखले देणे व नोंद ठेवणे यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत स्वतंत्र जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. मनपाकडून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळतात.

मात्र, मागील 5 ते 6 महिन्या पासून कोरोनाचे संकट आल्याने हे दाखले पुणेकरांना वेळेत मिळत नाही. हे दाखले तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे नातेवाईकांचे अनेक कामे खोळंबलेली आहेत. प्रशासनाकडून वेळेत काम पूर्ण न झाल्याने जन्म व मृत्यू कार्यालयात रांगा लागत आहे.

मृत्यू होऊन 6  महिने उलटले तरी मनपाकडे याबाबत नोंद नाही. त्यामुळे नागरिक कार्यालयात गर्दी करतात. परंतु, त्यांचे निराकरण न करता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. या प्रकरणी माहिती घेवून, आवश्यकता वाटल्यास कर्तव्य कसूर केल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनही आयुक्तांना दीपाली धुमाळ यांनी गुरुवारी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.