Pune News : वाढदिवसाला पुष्पगुच्छ, हारतुरे नको, वंचितांसाठी लस आणि रिक्षेवाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट द्या – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – कोविड 19 ची पहिली लाट ओसरली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला,सर्वसामान्य नागरिकांनी दैनंदिन व्यवहार सुरु केले, सगळेच जण थोडेसे बेफिकीर झाले आणि इथेच घात झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आणि खूप मोठया संख्येने नागरिकांना याची झळ पोहोचली. आत्ता दुसरी लाट ओसरत चालली आहे परंतु आपल्याला गाफिल राहून चालणार नाही असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

तिसऱ्या लाटेचा धोका थोपविण्यासाठी सर्वांचेच लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे असे सांगातानाच ” केवळ सरकार वर अवलंबून राहून चालणार नाही तर वंचितांना खासगी रुग्णालयामार्फत लस देण्यासाठी आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे ” आणि म्हणूनच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने (10 जून) मी सर्व स्नेह्यांना आवाहन करतो की मला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पुष्पगुच्छ / हारतुरे / मिठाई / केक / पुस्तके / धान्य ( तुला ) या स्वरूपात न देता लसीच्या स्वरूपात द्या, तुम्ही केलेल्या एका लसीच्या खर्चातुन एका वंचिताचे लसीकरण करणे शक्य होईल.

दुसरी लाट ओसरताना आता हळूहळू जनजीवन सुरळीत होईल, मात्र आर्थिक घडी सुरळीत व्हायला वेळ लागेल, अशा परिस्थितीत मी माझ्या मतदारसंघातील एक हजार रिक्षा चालकांना प्रत्येकी 1000/ रुपयाचे सीएनजी कुपन भेट देणार आहे. त्यासाठी देखील स्नेह्यांनी वाढदिवसाला किमान एक 200/ रुपयाचे कुपन भेट द्यावे असे आवाहन ही आ. चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दि. 8 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील कार्यालयातून लसीकरणासाठीच्या कुपनचे वाटप सुरु होईल व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार 1000/ वंचितांना कुपन देण्यात येईल.

लसीकरणासाठीचे कुपन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीने रेशनकार्ड व आधारकार्डाची प्रत सोबत आणावी. दि.10 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संजीवनी हॉस्पिटलच्या सहकार्याने महेश विद्यालय डी पी रस्ता, कोथरूड येथे लस देण्यात येणार आहे.

तसेच 9 जून रोजी आ.चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून रिक्षाचालक बांधवांना सीएनजी कुपनचे वाटप सुरु होईल. मोफत कुपन घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीने आधारकार्ड, लायसन्स, परमिट यांच्या झेरॉक्स प्रत सोबत आणाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.सदर कुपन ही प्रथम येणाऱ्या एक हजार रिक्षाचालकांना प्राधान्यक्रमानुसार देण्यात येईल व दिनांक 10 जून पासून साई सयाजी पंप, पौड रस्ता येथे रिक्षाचालकांना सी एन जी भरणा करता येईल, असे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील कर्वे पुतळा शेजारील कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.