Smruti Irani Program : कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर होत्या. बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी एका पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. परंतु या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला (Smruti Irani Program) गालबोट लागलं आहे. स्मृती इराणी बालगंधर्व सभागृहात आल्यावर त्या ठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या एका महिलेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. घोषणाबाजी करणारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आहे. वैशाली नागवडे असे या महिलेचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सकाळ पासून पुणे दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विरोध केला आहे. महागाईवरून त्यांनी केलेलं जुने विधान धरून या दोन्ही पक्षांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. जे डब्ल्यू मॅरिएट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तर बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

 

Rajbhavan : राजभवनाला राज्य शासनाकडून मागच्या 2 वर्षात 60 कोटींहून अधिक रक्कम

सायंकाळी साडेपाचनंतर स्मृती इराणी या बालगंधर्व येथील कार्यक्रमाला (Smruti Irani Program) उपस्थित राहिल्या. या ठिकाणी त्यांचा सन्मान होत असतानाच बाल्कनीत बसलेल्या काही महिलांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. घोषणा देणाऱ्या महिलांना भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. पोलीस बंदोबस्तात त्याठिकाणी त्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

 

मात्र अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना त्या महिला या ठिकाणी पोहोचल्या कशा, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. वैशाली नागवडे यांनी याप्रकरणी मारहाण केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डेक्कन पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.