Pune News : पुणेकरांनो मिळकत कर थकबाकीदार झालात तरच सवलत, प्रामाणिक करदात्यांना भाजपने फसविले : आबा बागुल

एमपीसी न्यूज – महापालिकेचा मिळकत कर नियमितपणे भरणाऱ्यांना, स्थायी समितीच्या निर्णयाद्वारे पुढील वर्षापर्यंत देण्यात आलेली 15 टक्के सूट रद्द करुन सत्ताधारी भाजपने प्रामाणिक करदात्यांना फसवले आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.

महापालिका हद्दीतील मिळकत कराची 50 लाखांहून कमी थकबाकी असणाऱ्या थकबाकीदरांना व्याजात 80 टक्के सूट देण्याचा निर्णय घेताना नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांना प्रोत्साहन म्हणून पुढच्या सप्टेंबरच्या एक वर्षापर्यंत मिळकत करात 15 टक्के सूट देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. स्थायी समितीत सर्वपक्षीयांच्यामध्ये एकमताने झालेला निर्णय पायदळी तुडवून सत्ताधारी भाजप प्रत्यक्षात फक्त 50 लाखांवर थकबाकी असणाऱ्यांनाच व्याजात 80 टक्के सवलत हाच फक्त निर्णय अमलात आणू पहात आहे.

प्रामाणिक करदात्यांना पुढील वर्षापर्यंत देण्यात आलेली 15 टक्के सूट रद्द करण्यात आलेली आहे किंवा अशी सूट दिलीच गेली नाही ही बाब निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची ही फसवणूकच आहे. या संदर्भात सत्ताधारी भाजपने आणि पालिका प्रशासनाने खुलासा करणे आवश्यक आहे, अशी मागणी आबा बागुल यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रामाणिकपणे, नियमित मिळकत कर भरणाऱ्यांना देऊ केलेली 15 टक्के सूटही अमलांत आणा, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. प्रामाणिक करदात्यांना सूट न दिल्यास पालिकेच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होतील. यापुढे प्रामाणिक करदाते थकबाकीदार होऊन सवलतींची अपेक्षा करतील. हे दुष्टचक्र टाळायला हवे, असेही बागुल यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.