Pune News : जायका प्रकल्पात भाजपकडून पुणेकरांची फसवाफसवी : मोहन जोशी

एमपीसी न्यूज : मुठा नदी सुधारणेसाठी आणि त्या अंतर्गत ‘जायका’प्रकल्प उभाणीसाठी गेल्या सहा वर्षात फक्त बैठका घेऊन, पोकळ घोषणा करून भाजपच्या नेत्यांनी पुणेकरांबरोबर फक्त फसवाफसवी केली. त्यांना नदी सुधार योजनेत काही स्वारस्य दिसत नाही. महापालिका निवडणुका जवळ आल्याने त्यांचा केवळ प्रसिध्दीचा स्टंट चालू आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.

नदी सुधार योजनेतील जायका प्रकल्पासाठी निविदा मागविल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

महापालिका निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्याने बैठक घेऊन कामाचा देखावा करण्यात आला. सहा वर्षापूर्वी योजना मंजूर झाली. तेव्हापासून प्रत्यक्ष कामाऐवजी भाजप नेते, मंत्री यांच्या फक्त बैठकाच झाल्या आणि कामांच्या घोषणा करण्यात आल्या.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत मुठा नदी सुधार योजना आणि त्यासाठी निधी मंजूर झाला. प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा कारभार दोन वेळा सोपविण्यात आला, पण पुणे महापालिका नदी सुधार योजनेचे काम पूर्णत्वास नेऊ शकलेले नाहीत. जावडेकर आणि माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे सहा वेळा पत्रकार परिषदा घेऊन कामाच्या फक्त घोषणा केल्या.

भाजपच्या नेत्यांनी योजना मंजुरीबद्दल जावडेकरांचा सत्कारही केला, त्याला पाच वर्षे उलटूनही गेली. मात्र, योजना अद्यापही कागदावरच आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपने मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्याचा प्रयत्न केला. कामात हस्तक्षेप केले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च दीडपटीहून अधिक वाढला. हा खर्च एक हजार कोटीवरुन पावणेदोन हजार कोटीवर गेला. केंद्राकडून साडेआठशे कोटीचे अनुदान मिळणार आहे. परंतु वाढीव खर्च सुमारे साडेआठशे कोटी होणार असून त्याचा भार महापालिकेवर पडणार आहे आणि याला भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.

पुणेकरांनी त्याचा जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपच्या या कारभारामुळे केवळ नदी सुधारच नव्हे तर उड्डाणपूल, स्मार्ट सिटी योजना, समान पाणीपुरवठा योजना अशा त्या पक्षानेच गाजावाजा केलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ झालेला आहे, असा आरोप जोशी यांनी पत्रकात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.