Pune News: भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुळीक यांनी स्वतः ट्विट करून शनिवारी माहिती दिली आहे. 

‘त्यानं’ मला गाठलं याचं दु:ख नाही. पण, तुम्हा सर्वांपासून काही काळ दूर जावं लागणार, याचं वाईट वाटत आहे. मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. आता युद्ध कोरोनाच्या विरोधात. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाच्या बळावर मी लवकरच ठणठणीत होईनच. तोवर तात्पुरता राम राम घ्यावा, असे जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागील 5 महिन्यांत सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मदत करण्यसाठी ते पुढाकार घेत असतात. त्यामधूनच या नगरसेवकांना कोरोनाची लागण होत आहे.

यापूर्वी  महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यासह नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी वेळीच उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्या नंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.