Pune News : भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनाही कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यामध्ये अनेक नगरसेवकांनी यशस्वी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. आता भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच फेसबुकवर यासंबंधीची माहिती दिली आहे.

डॉक्टरांच्या सूचनेनुसार बालवडकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे कार्यालय नियमित सुरू असून, फोनच्या माध्यमातून ते उपलब्ध असतील. उपचार घेऊन लवकरच बरा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांच्यासह इतर नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

मागील 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले आहे. या कालावधीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना अन्नधान्य वाटप, जेवण वाटपासून ते आरोग्य साहित्य पुरविण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. जनतेत मिसळताना, सार्वजनिक ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणत खबरदारी घेतली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या नगरसेवकांना कोरोना होत असल्याचे समोर येत आहे.

वडगावशेरी मतदारसंघातील एका नगरसेविकेला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्याचा भागात एका नगरसेवकाच्या घरातील सदस्याला कोरोना झाला होता. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर मतदारसंघात एका नगरसेविकेच्या घरात सदस्याला कोरोना झाला होता. यामुळे आता इतर नगरसेवकांनी आणखी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘मला काहीही होणार नाही’, असे वागून चालणार नाही. फिजिकल डिस्टनसिंग, मास्कचा वापर, सॅनिटायजर लावणे, वारंवार हात धुणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे आवश्यक असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.