Pune News : भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

विद्यार्थी प्रतिनिधी ते नगरसेवक असा महेश लडकत यांचा प्रवास..!

एमपीसी न्यूज : उद्यम सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष, भाजपचे नवी पेठ प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक महेश लडकत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

महेश लडकत यांनी शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद आणि पुणे महापलिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भुषविले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने गेली काही दिवस त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.

आज (मंगळवार दि. 29) सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव त्याच्या राहत्या घरी आणले जाईल त्यानंतर साडे दहा वाजता त्यांचे पार्थिव संपर्क कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

महेश लडकत यांनी गरवारे कॉलेजचे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करुन आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. पुढे पतित पावन संघ मग त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्य सुरू केले. नगरसेवक म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.

उद्यम बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. नवी पेठ, दत्तवाडी व राजेंद्र नगरच्या भागातील अनेक गरजू तरुणांना त्यांनी बँकेत व शिक्षण मंडळात नोकरीला लावले होते. सर्वपक्षीय नगरसेवक, कार्यकर्त्यांशी मैत्री असणारा आणि लोकांसाठी सतत झटणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख जनमानसात होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.