Pune News : लसीकरणाचा डेटा चोरी करून लसीकरण प्रमाणपत्रावर भाजप नगरसेवकांची जाहिरात

एमपीसी न्यूज – येरवडा परिसरातील भाजपचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी व त्यांचा मुलगा उदय कर्णे यांनी लसीकरणाचा डेटा चोरी केल्याची तक्रार करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका लेखी पत्राद्वारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे पोलिसांच्या सायबर सेल कडे केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’ शहर तथा देशभरात कोविड व्हॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. सेंटरवर गेलेल्या प्रत्येक नागरिकाचे रजिस्ट्रेशन केंद्र सरकारच्या कोविन ॲपमध्ये ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुद्धा केले जाते. तसेच हा डेटा पुणे महानगरपालिका प्रशासन व केंद्र सरकारच्या प्रशासनाकडे सुरक्षितरित्या जतन असणे हे कायद्यानुसार अपेक्षित आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या गोपिनिय कायद्यानुसार हा डेटा कुठल्याही राजकीय पक्षाला व्यवसायिक आस्थापनांना देता येत नाही, असे असताना पुणे शहरात विविध केंद्रांवर लसीकरण झालेल्या नागरीकांचा डेटा हा काही नगरसेवकांनी बेकायदेशीररित्या मिळवला असून त्या डेटावरील मोबाईल नंबरवर केंद्र शासनाचे सर्टिफिकेट व स्वतःचे प्रचार करणारे सर्टिफिकेट पाठवले जात आहेत, ही गंभीर बाब आहे. या डेटायामध्ये प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक, खाजगी व्यवसायिक (मालमत्ते विषयी) माहिती लिंक असल्यामुळे त्या प्रत्येक नागरिकाचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. हा संविधानाने दिलेल्या गोपिनीय कायद्याचा भंग आहे.

येरवडा परिसरातील भाजपचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी व त्यांचा मुलगा उदय कर्णे यांनी गोपनीय कायद्याचा भंग करून अशा पद्धतीने माहिती मिळून या सर्व नागरिकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर स्वतःचे प्रचार करणारे सर्टिफिकेट हे SMS अथवा व्हाट्सअपद्वारे त्यांच्या मुलाच्या मोबाईल नंबरवरून (९६५७१३९०३९) पाठवलेले आहेत. हे शासकीय शिष्टाचाराला धरून नाही, हा डेटा श्री. कर्णे गुरुजी यांना कोणी दिला याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच पुणे शहरात अशाप्रकारे आणखी किती लोकांना हा डेटा पुरविला आहे याची चौकशी जलद गतीने होणे अत्यंत आवश्यक आहे.या निवेदनाद्वारे आम्ही श्री. बापूराव कर्णे गुरुजी व त्यांचा मुलगा उदय कर्णे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.