Pune News : विषय समिती अध्यक्ष, उपाध्यक्षपदी भाजपचाच दबदबा ; महाविकास आघाडीचा पराभव

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्याच उमेदवारांची निवड झाली. तर, या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचा पराभव झाला.

बुधवारी (दि. 30 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता या समित्यांच्या निवडणुकीस प्रारंभ झाला. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालली. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली.

पुणे महापालिकेच्या शहर सुधार समिती अध्यक्षपदी प्रसन्न जगताप, उपाध्यक्षपदी शीतल सावंत, क्रीडा समिती अध्यक्षपदी विरसेन जगताप, उपाध्यक्षपदी छाया मारणे, महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदी माधुरी सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्षपदी वृषाली चौधरी, विधी समिती अध्यक्षपदी मनीषा लडकत, उपाध्यक्षपदी मनीषा कदम यांची निवड झाली आहे.

या चारही समित्यांवर भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. भाजपच्या चारही उमेदवारांना प्रत्येकी 8 तर, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 मते मिळाली. या समित्यात भाजपचे 8, राष्ट्रवादी 3, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 1-1 सदस्य आहेत.

भाजपच्या विजयी उमेदवारांचा महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रविण चोरबेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर, आगामी महापालिका निवडणुकीसाठी या निवडी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत.

या निवडणुकीसाठी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे पीठासीन अधिकारी म्हणून, प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.