Pune News : सुशांत प्रकरणात भाजपने आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं नाही – देवेंद्र फडणवीस

या प्रकरणात ज्याप्रकारचे खुलासे समोर येत आहेत ते आश्चर्यचकित करणारे आहेत.

एमपीसी न्यूज – सुशांत सिंग प्रकरणात भाजपच्या कुठल्याही नेत्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही. मात्र, या प्रकरणात ज्याप्रकारचे खुलासे समोर येत आहेत ते आश्चर्यचकित करणारे आहेत. सीबीआय चौकशी सुरू होईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत, हा एक मोठा प्रश्न असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ व इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते.

याप्रसंगी बोलताना फडणवीस असे म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येचा चाळीस दिवसानंतर हा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला. या चाळीस दिवसानंतर जी माहिती समोर येत आहे ती अगोदर का बाहेर आली नाही.

माध्यमातून मिळालेल्या माहितीचा दाखला देत ते पुढे म्हणाले की, या चाळीस दिवसात जर पुरावे नष्ट झाले असतील तर? आठ हार्डडीस्क नष्ट करण्यात आल्या अशी माहिती जी समोर येत आहे.

त्यामुळे मुंबई पोलीसांवर नेमका कसला दबाव होता की काही राजकीय दबाव होता किंवा त्यांनी या प्रकरणाचा तपास केला नाही असा प्रश्न उपस्थित राहतो, असे फडणवीस म्हणाले.

सीबीआय याप्रकरणाची तपासणी करत असून आता काय सत्य आहे ते समोर येईल. मात्र, हा तपास जर लवकर झाला असता आणि योग्य दिशेने झाला असता तर या प्रकरणात नेमकं काय घडलं आहे आणि कोण दोषी आहे ते समोर आलं असतं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.