Pune News : भाजपच्या वतीने 51 हजार वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 51 व्या वाढदिवसानिम्मित शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या 51 हजार वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते आज पाचगाव-पर्वती वनविहारात करण्यात आला.

मुळीक म्हणाले, ‘शहराच्या विकासाचा पुढील 50 वर्षांचा वेध घेत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामांना गती देण्यात आली. शाश्वत आणि गतिमान विकास करीत पुण्याला जगातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्याची फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचा उद्देशाने शहरात 51 हजार वृक्ष लावण्याचे अभियान हाती घेण्यात आले. त्या अंतर्गत आज शहरात 500 कार्यक्रम झाले. पुढील आठ दिवस अभियान सुरू राहील.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘केंद्र सरकारने नागरी वन उद्याने विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने संयुक्त वन व्यवस्थापन योजने अंतर्गत 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत शहरातील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वनीकरण करता येईल.’

अध्यक्ष जगदीश मुळीक, शहर सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, नगरसेवक सरस्वती शेंडगे, सुशील मेंगडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संदीप काळे, धर्मेश रजपूत, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.