Pune News: पदवीधर मतदार नोंदणीसाठी भाजप पोहचला खेड्यापाड्यात, अगदी शेतकऱ्यांच्या मळ्यात!

एमपीसी न्यूज – विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच मोर्चेबांधणी चालविल्याचे पाहायला मिळत आहे. मतदार नोंदणी शहरांपुरती मर्यादित न ठेवता खेडोपाड्यात जाऊन मतदार नोंदणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पदवीधर मतदार नोंदणीच्या तयारीसाठी प्रथमच शेतमळ्यात पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.
 
पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी आतापर्यंत सर्वसाधारणपणे शहरी भागात जोर दिला जात होता. पण ग्रामीण भागातही पदवीधर तरुणांची संख्या मोठी असल्याने त्या भागातही मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे धोरण भाजपने निश्चित केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी प्रमुख रवींद्र भेगडे यांनी सांगितले. 
 

आंबेगाव व जुन्नर तालुका या ठिकाणी पदवीधर नोंदणी अभियानासंदर्भात आज आढावा बैठका पार पडल्या. या आढावा बैठकीसाठी रवींद्र भेगडे यांच्यासह पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस अविनाश बवरे, संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, आंबेगाव तालुका सरचिटणीस संदीप बाणखेले, आंबेगाव तालुका पदवीधर नोंदणी प्रमुख उत्तम राक्षे ,संतोष हिंगे व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे ही बैठक चक्क एका शेतात झाली. 
 
भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची जबाबदारी रवींद्र भेगडे यांच्या खांद्यावर दिली असून सध्या ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.  तालुक्यातील जास्तीत जास्त पदवीधरांची मतदार नोंदणी करून त्यांना पदवीधर मतदारांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन भेगडे यांनी या बैठकांमध्ये केले
 
जुन्नर तालुकयातील आढावा बैठकीस भाजपचे जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष तांबे, जुन्नर तालुका पदवीधर नोंदणी प्रमुख व भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस मयूर तुळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.