Pune News: पदवीधर मतदार नोंदणीसाठी ‘भाजयुमो’ने पुढाकार घ्यावा – रवींंद्र भेगडे

एमपीसी न्यूज – पदवीधरांची एकूण संख्या दोन कोटी असताना त्यापैकी आतापर्यंत केवळ चार लाख पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणीसाठी अजून खूप मोठा वाव असून पदवीधर मतदार नोंदणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केले.

पुणे पदवीधर मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चाची बैठक पुण्यात महापौर निवास येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,भाजपा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष किरण दगडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा प्रभारी प्रवीण काळभोर आदी यावेळी उपस्थित होते.

रवींद्र भेगडे म्हणाले की, पदवीधरांची एकूण संख्या खूप मोठी आहे. त्यापैकी दोन टक्के पदवीधरांची देखील मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे उर्वरित 98 टक्के पदवीधरांपर्यंत पोहचून त्यापैकी जास्तीत जास्त जणांना मतदानाचा हक्क मिळवून देण्याचे मोठे आव्हान भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी स्वीकारले पाहिजे.

या मतदार नोंदणीच्या निमित्ताने भाजपचे काम लोकांपर्यंत पोहचविण्याबरोबरच पक्ष संघटन मजबूत होणे, नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडले जाणे यासाठी देखील त्याचा उपयोग होणार आहे, याकडेही रवींद्र भेगडे यांनी लक्ष वेधले.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही यावेळी युवा मोर्चाने प्रत्येक बूथ निहाय मतदार नोंदणी कार्यक्रम राबवावा, अशी सूचना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.