Pune News : मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. त्याच्या विरोधात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे सोमवारी दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यास भाजपने पाठिंबा जाहीर केला आहे.

सर्व व्यवहार सुरळीत केले असताना गेल्या पाच महिन्यांपासून फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. राज्य सरकार त्यांना कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत.

देशातल्या अन्य राज्यात मात्र, मंदिरे सुरु आहेत. म्हणून देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे सोमवार दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी केली आहे.

या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा व शंख वाजवून

मंदिर हम खुलवायेंगे। धर्म को न्याय दिलायेंगे॥

हा नारा देत आंदोलन करावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.