Pune News : निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का?, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असा संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असेल असे जाहीर केले.

चंद्रकांत पाटील सोमवारी पुण्यात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य नेणारे वाहन रवाना केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, सरकार किती दिवस व्यापार बंद ठेवणार आणि जनजीवनही बंद ठेवणार आहे ? दारुची दुकाने चालू ठेवायची आणि कपडे आणि किराणा दुकानांवर निर्बंध लादायचे याला अर्थ नाही. आर्थिक व्यवहार बंद राहिले तर लोकांना जगणे अवघड होईल. दुकाने पुन्हा एकदा नियमितपणे सुरू झाली पाहिजेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा आहे. गरज पडल्यास आपण स्वतः व्यापाऱ्यांचे नेतृत्व करू.

ते म्हणाले की, राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या आमदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड येथील महापालिका भाजप नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी मदत करतील. पूरग्रस्तांसाठी कोणते मदत साहित्य पाठवायचे याची यादी पक्षातर्फे कार्यकर्त्यांना पाठवली आहे. त्यानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत सुरू केली आहे. पुण्यातून आतापर्यंत मदत साहित्याचे अठरा ट्रक – टेंपो पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईतून मदत पाठवली आहे. भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कोल्हापूरसाठी मदत पाठवली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.