Pune News : अंशतः लॉकडाऊनच्या विरोधात भाजपचे आंदोलन ; खासदार गिरीश बापट पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – आजपासून (शनिवारी ) पुण्यात लागू करण्यात आलेल्या अंशतः लॉकडाऊनच्या विरोधात भाजपने पुण्यात आंदोलन केले. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार व भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश बापट आणि जगदीश मुळीक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.03) पुण्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्बंध लागू करण्यात आले. पुण्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. यावेळेत पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याचीही घोषणा झाली.

तसेच, पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, भाजपाने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे.

पीएमपीएल सेवा पुन्हा सुरू करा या मागणीसाठी गिरीश बापट यांनी वायरलेस व्हॅनमध्ये बसून आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गिरीश बापट म्हणाले, पीएमपीएमएल बंद झाली नाही पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ‘पीएमपी’च्या बाबतीत 50 टक्क्यांचा जो नियम होता तो 40 टक्के करा, बाहेर जाणाऱ्या कामगारांना प्राधान्य द्या, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या. हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्यासही त्यांनी विरोध केला आहे. हॉटेल पूर्ण बंद न ठेवता, उभं राहून खाण्याची व्यवस्था ठेवावी. पार्सल सुविधा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवावी. बाहेरगावच्यांची उपासमार होऊ नये यासाठी हे महत्वाचं आहे. शहरातील हातगाड्यांवर पाच पेक्षा अधिक लोकं जमू नये.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.