Pune News : भाजपच्या आंदोलनाने सरकारला बुद्धी आली : जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येऊन सुद्धा आणि राज्यातील इतर अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल होत असतानाही पुण्यातील निर्बंध कायम ठेवून  महाविकास आघाडीचे सरकार पुण्यावर अन्याय करत होते.  भाजपच्या अनेक आंदोलनानंतर आज अखेरीस पुणेकरांचा आक्रोश  राज्य सरकारच्या बंद कानामध्ये देवाच्या कृपेने घुसला आणि पुण्यातील निर्बंध शिथिल करायची बुद्धी महाविकासआघाडी सरकारला झाली, असे मत भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, निर्बंधामुळे सर्व नागरिक, व्यापारी, कामगार, छोटे व्यावसायिक यांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट  झाला होता.  तरीसुद्धा राज्य सरकार आपल्या आडमुठया  धोरणापासून फारकत घेत नव्हते.  त्याविरुद्ध  भाजपने पुणेकर नागरिकांच्या वतीने दगडूशेठ गणपती समोर गाऱ्हाणे मांडले. पुण्यावरील अन्यायकारक निर्बंध शिथिल करावेत, यासाठी आंदोलन केले.

मागील दीड वर्षापासून कोरोना  महामारीमुळे संपूर्ण जनतेचे अर्थकारण पूर्ण विस्कळीत झाले आहे.  त्यामुळे चालू असलेले निर्बंध शिथिल करणे अत्यंत आवश्यक होते.  राज्य सरकार पुणे शहरात संसर्ग आटोक्यात आलेला असताना सुद्धा केवळ पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे  आडमुठेपणाने  पुण्यावर अन्याय करत होते.  पण अखेरीस जनतेच्या वाढत्या आक्रोशापुढे राज्य सरकारला नमते घ्यायला आम्ही भाग पाडले,  असे मुळीक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.