Pune News : सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून भाजपची महाआरती

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होऊनही राज्य सरकार शहरातील निर्बंध शिथील करत नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना निर्बंध कमी करण्याची सरकारला सुबुद्धी मिळावी, यासाठी शहर भाजपने आज दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्यांना विश्वास आणि पाठिंबा देण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ”राज्य सरकार पुण्याला सापत्न वागणूक देत आहे. शहरातील कोरोना रुग्ण वाढीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु, निर्बंध कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नाही. निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांकडे विषय टोलविण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात पुणेकरांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. सरकारला सुबुद्धी मिळावी, म्हणून आज दगडूशेठ हलवाई मंदिरात महाआरती केली. नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर पदयात्रा काढण्यात आली. दुकानदारांना धीर दिला.”

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस तसेच प्रभारी धीरज घाटे, पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, प्रमोद कोंढरे, पुनीत जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित  होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.